महामानवाच्या जयघोषाने दुमदुमला संविधान चौक
नागपूर , ( दिनेश घरडे ) :
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्य देश विदेशात जल्लोष सुरु असून आंबेडकरी अनुयायांचा गढ समजल्या जाणा-या इंदोरा येथे दरवर्षी आंबेडकर जयंती समारोह ऐतिहासिक ठरत असतो. 14 एप्रिलच्या पूर्वसंध्येला आज (दि.१३) रोजी इंदोरा बुध्द विहार येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्मगुरु भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात निघालेल्या रॅलीत बग्गी, रथावर महामानवाच्या जीवनावर आधारित सुंदर देखावे असून भीम- बुध्द गीतांवर तरुणाई डोलत आहे. निळ्या गुलालांची उधळण करीत ढोल ताशांचा गजर आणि फटाक्याची आतशबाजीने संविधान चौक देखील आजपासूनच दणाणला आहे.
आज (शुक्रवारी) रात्री ९.०० वाजता इंदोरा बुध्द विहार कमिटीतर्फे जंगी मिरवणुक काढण्यात आली आहे. इंदोरा बुध्द विहार येथून बुद्ध वंदनेने रॅलीची सुरुवात झाली. ढोल – ताशे आणि फटाक्यांची आतशबाजीसह ही रॅली इंदोरा चौकात पोहोचली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण केल्यावर या रॅलीने दहा नंबर पूल, कड़बी चौक, गड्डीगोदाम, एलआयसी चौक, आदी मार्गक्रम केले. महामानवाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. उपासक- उपासिका पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करीत मिरवणूकीत सहभागी झाले आहेत. पंचशील ध्वज आणि महामानवाच्या जीवनावर आधारित सुंदर देखावे सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. जल्लोषात ही मिरवणूक १२ च्या ठोक्याला संविधान चौकात पोहोचताच फटाक्यांची आतशबाजी होणार आहे. भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई हे उपस्थितांना मार्गदर्शन करीत आहेत. त्रिशरण पंचशीलाने रॅलीचा समारोप होणार आहे.
मिरवणूकीत इंदोरा बुध्द विहार कमिटीच्या पदाधिकाऱ्यासह बौद्ध भंन्ते, उपासक – उपासिका, व धम्मसेनेचे पदाधिकारी आणि समता सैनिक दलाचे स्वंयसेवक व कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले आहेत.